नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्यात बंदी असलेल्या गोमांसची बेकायदा विक्री करणाºया एकास टोळक्याने चांगलाच चोप दिला. ही घटना फुलेनगर येथील पाटाजवळील मुंजोबा चौकात घडली. या घटनेत विक्रेत्यास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोसिन शब्बीर कुरेशी (४० रा.उमराव मेडिकल जवळ फुलेमार्केट भद्रकाली) असे टोळक्याच्या हल्यात जखमी झालेल्या मांस विक्रेत्याचे नाव आहे. कुरेशी बुधवारी (दि.२८) सायंकाळी नेहमी प्रमाणे फुलेनगर येथील पाट किनारी असलेल्या मुंजोबा चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करीत असतांना ही घटना घडली.
गोमांस विक्री करीत असतांना अचानक आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने त्यास जाब विचारत गोमांसाचे नुकसान करीत त्यास मारहाण केली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
पर्स दुचाकीस्वारांनी हिसकावून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पादचारी महिलेच्या हातातून रोकड असलेली पर्स दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना गोविंदनगर भागात घडली. या घटनेत २ लाख ४ हजाराच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी मुबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजेदा झालुफेकार काझी (रा.नरहरीनगर,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. काझी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. गुरूवारी (दि.२९) दुपारी त्या गोविंदनगर भागात गेल्या होत्या. व्यवसायासाठी हातऊसनवार रोकड घेवून त्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. साडे तीन वाजेच्या सुमारास स्मॉल फायनान्स समोरील रस्त्याने इंदिरानगर बोगद्याकडे जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून नेली. यापर्स मध्ये २ लाख चार हजार रूपयांची रोकड होती. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.