नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुटुंबियांच्या पसंतीनतर साखरपुडा झाल्याने वराने वधूस वेगवेगळया भागात घेवून जात बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिना भराच्या मौजमजेनंतर अचानक कुठलेही कारण नसतांना लग्नास नकार देण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत जाधव (रा.हिरावाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जेलरोड भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. विवाह इच्छुक वधू वरांच्या शोध मोहिमेत संशयित व पीडितेचा विवाह कुटुंबाने निश्चित केला होता. दोघांच्या व कौटुबिंक पसंतीनतर गेल्या १० जूलै रोजी मोठ्या दिमाखात दोघांचा साखरपुडा पार पडला. दोन्ही कुटुंबामध्ये विवाहाची तारीख निश्चित करण्याचे काम सुरू् असतांना नववधू व वराने एकमेकांमध्ये भेटी घेतल्या असता ही घटना घडली.
संशयित वराने फिरण्यासाठी बाहेर घेवून जात असल्याचा बहाणाकरून शहरातील वेगवेगळ्या भागात तसेच त्र्यंबकेश्वर येथील हॉटेल कम्फर्ट येथे घेवून जात पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर संशयिताने अचानक कुठलेही कारण नसतांना लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.