नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पखालरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन लाखाच्या रोकडसह आयफोन व सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजूम बिसमिल्ला कुरेशी (रा.गुलशन कॉलनी पखालरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भंगार व्यावसायीक असलेले कुरेशी कुटुंबिय शनिवारी (दि.२४) विवाह सोहळया निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, आयफोन व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७ लाख ५२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना कुरेशी कुटूंबिय दोन दिवसानंतर घरी परतले असता उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.