नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदाघाटावर येणा-या भाविक महिलांच्या पर्समधील अलंकार हातोहात लांबविणारा जालना येथील चोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने दुधबाजारात बेड्या ठोकल्या. संशयिताने सराफास विक्री केलेले सव्वा लाखाचे सोने हस्तगत करण्यात आले असून त्याच्या अटकेने दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
शंकर भानुदास काळे (२१ रा.आष्टी ता.परतुर जि.जालना) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गोदाघाटावर चोरी करणारा भामटा दुधबाजारातील एका सराफाकडे सोने विक्री करण्यासाठी जाणार असल्याची माहिती युनिटचे हवालदार रविंद्र आढाव व अंमलदार विलास चारोस्कर यांना मिळाली होती. त्यानुसार पथराने सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले असता त्याने कपालेश्वर मंदिर व सांडवा देवी मंदिर परिसरात बाहेरगावाहून येणाºया भाविक महिलांवर पाळत ठेवून पर्स मधील अलंकार चोरी केल्याची कबुली दिली.
सदरचे सोने एका सराफास विक्री केल्याची माहिती दिल्याने पोलीसांनी सराफाकडून सुमारे १ लाख १४ हजार रूपये किमतीच्या व १२ गॅ्रम वजनाच्या दोन सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या असून त्यास मुद्देमालासह पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये उपनिरीक्षक सुदाम सांगळे,चेतन श्रीवंत हवालदार रविंद्र आढाव,योगीराज गायकवाड,देविदास ठाकरे,उत्तम पवार,रोहिदास लिलके,प्रदिप म्हसदे,विशाल काठे,धनंजय शिंदे अंमलदार विलास चारोस्कर,जगेश्वर बोरसे,आप्पा पानवळकर,अनुजा येलवे व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.