नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम व्यावसायीकावंर चाकू हल्ला करून रोकड पळविण्याच्या प्रयत्न करणा-या टोळीचा छडा लावण्यात गंगापूर पोलीसांना यश आले आहे. ऑफीस बॉयने सुपारी देवून आपल्या मालकांची रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून, पोलीसांनी वेगवेगळया भागातून ऑफिस बॉयसह नगर जिल्ह्यातील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत त्यात एका विधी संघर्षीत बालकाराचा समावेश असून संशयितांकडून गुन्हयात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
रोहित किशोर लोहिया,विराज कैलास कानडे,संकेत किशोर मंडलिक (रा.तिघे कोपरगाव जि.अ.नगर),जयेश चंद्रकुमार वाघ (रा.पाईपलाईनरोड) व उदय राजेंद्र घाडगे (मुळ रा. कोपरगाव हल्ली मोनाली अपा.पंचवटी ईलाईट हॉटेल मागेत्र्यंबकरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गेल्या १७ ऑगस्ट रोजी रात्री आडे आठ वाजेच्या सुमारास महात्मानगर येथील पाण्याची टाकी भागात ही घटना घडली होती.
याप्रकरणी दीपक रामू खताळे (रा.वेळूंजे ता. त्र्यंबकेश्वर) यांनी फिर्याद दिली होती. बांधकाम ठेकेदार खताळे व व्यावसायीक मित्र शारीक शेख हे दोघे मित्र महात्मानगर येथील डाक सेवा मंडळ बिल्डींग परिसरातील आपल्या कार्यालयात जात असतांना हा लुटमारीचा प्रयत्न झाला. ऑफिस बॉय असलेला चालक जयेश वाघ हा चारचाकी पार्क करीत असतांना गाडी खाली उतरलेल्या खताळे व शारिक शेख यांच्यावर दबा धरून बसलेल्या टोळक्याने हल्ला केला होता.. यावेळी खताळे यांच्या हातातील दोन लाखाची रोकड असलेली बॅग भामट्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघा मित्रांनी प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केल्याने लुटारूनी धुम ठोकली होती. या हल्यात दोघा मित्रांवर चाकू हल्ला करण्यात आल्याने ते जखमी झाले होते.
या घटनेची गंभीर दखल घेत गंगापूर पोलीस कामाला लागले होते. सीसीटिव्ही फुटेजमधील तपासणीत ऑफिस बॉय जयेश वाघ हा घटनास्थळी असूनही तो मालकांच्या मदतीला गेला नाही ही बाब निदर्शनास आल्याने पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलीस तपासात संशयिताकडून झालेली रेकी आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता नाशिक,कोपरगाव,शिर्डी व राहता येथील संशयितांची नावे समोर आली तसेच चारही संशयित ऑफिस बॉय असलेल्या वाघ याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीसांनी हल्लेखोरापैकी नाशिकमध्ये वास्तव्यास असलेल्या उदय घाडगे याला उचलले कौशल्यपूर्ण तपासात त्याने गुन्हयाची कबुली देत ऑफिस बॉय जयेश वाघ याच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याची माहिती दिली.
या गुन्हयासाठी संकेत मंडलिक याच्या माध्यमातून एका विधी संघर्षित बालकासह उर्वरीत साथीदारांना नाशिक येथे पाचारण करण्यात येवून त्यांना संशयित ऑफिस बॉय वाघ काम करीत असलेल्या शारिक शेख यांच्या कार्यालयातच वास्तव्यास ठेवण्यात आल्याची माहिती निष्पन्न झाले. गंगापूर पोलीसांनी कोपरगाव गाठून चौघासह नाशिक मधील दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करणात आली आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुशिल जुमडे व जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील,हवालदार रविंद्र मोहिते, गिरीष महाले,गणेश रेहरे,सचिन काळे अंमलदार मच्छींद्र वाघचौरे,गोसावी,गोरख साळुंके,सुजित जाधव,सोनू खाडे,भागवत थविल,शिवम साबळे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील पवार व अंमलदार समाधान आहेर करीत आहेत.