नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शैक्षणिक कर्जाच्या मोबदल्यात तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा परस्पर लिलाव करणे बँक अधिकारी व कर्मचा-यांना चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये संबधीताविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार चौराजादे, प्रमोद लासुरे व अमोल जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बँक अधिकारी कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबत प्रेमकुमार दुबे (रा.सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. दुबे यांनी मुलगा प्रविण दुबे याच्या उच्च शिक्षणासाठी पुर्वीच्या को ऑपरेशन बँक व आत्ताची युनियन बँक ऑफ इंडियाच्या गंगापूररोड शाखेतून शैक्षणीक कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या मोबदल्यात बँकेकडे अंबड येथील स्वामी नगर भागातील सर्व्हे नं. २२७ – ब प्लॉट नं. ६ हा भूखंड तारण ठेवण्यात आला होता. बँकेच्या विलनीकरणानंतर १९ मार्च ते ६ जून २०२२ दरम्यान संशयित अधिकारी कर्मचा-यांनी स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करीत खोटी साक्षरी असलेला पंचनामा तयार करून खोटा पझेशन पंचनामा तयार केला.
तसेच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता भूखंडाची परस्पर लिलाव प्रक्रिया पार पाडून भूखंड विक्री केला. ही बाब निदर्शनास येताच दुबे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. कोर्ट क्र. ९ चे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबधीतावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे करीत आहेत.