नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिरावाडी परिसरात गुरूवारी (दि.१५) रात्री किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार महेंद्र विजय बेलाडकर (रा.शिवनयन अपा. हिरावाडी) यानी दिली आहे. बेलावडकर यांचा मुलगा साहिल व अभिषेक भडांगे हे दोघे मित्र रात्री साडे अकराच्या सुमारास परिसरातील साई ओम जनरल स्टोअर्स येथे उभे असतांना संशयित विनोद दौलत शिंदे (रा. हिरावाडी) तेथे आला. यावेळी साहिल बेलाडकर याने माझ्या घरासमोर येवून शिवीगाळ का करत होता. याबाबत जाब विचारल्याने संतप्त शिंदे याने रिक्षातून लाकडी दांडका काढून दोघा मित्रांना बेदम मारहाण केली.
या घटनेत साहिल यास दगड फेकुण मारण्यात आला असून या हाणामारीत दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. तर विनोद शिंदे (रा.गोकुळ दर्शन अपा. गोकुळनगर हिरावाडी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास साई ओम जनरल स्टोअर्स येथे किराणा माल घेण्यासाठी थांबलेलो असता ही घटना घडली.
भोला उर्फ अभिषेक भडांगे याने तू इकडे रिक्षा का घेवून आला अशी विचारपूस करीत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर भडांगे याचा मित्र बेलाडकर याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.