नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथील हॉटेल व्यावसायिक अमित खोत यांनी याकुब अब्दुल शेख व शरीफ अब्दुल कोकणी यांच्या विरोधात खोटे दस्तावेज करून अमित खोत व कुटुंबीय यांची सारडा सर्कल येथील जमीन हडप करण्याबाबत तक्रार दाखल केली असून याबाबतचा गुन्हा भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी –खोत कुटुंबियांची वडिलोपार्जित मिळकत सारडा सर्कल येथे असून त्यात सुमारे २००० वाराचे ८ प्लॉटस आहेत. हे सर्व प्लॉटस भाडेतत्वावर दिले असून त्यातील मोकळ्या ५ क्रमांकाच्या प्लॉटवर म्हसोबा मंदिर आहे.येथे दरवर्षी उत्सव साजरा होतो व हा जाण्यायेण्याचा रस्ता आहे.हा प्लॉट नं.५ चंद्रकांत खोत यांनी जहांगीर दस्तगीर कोकणी व मैनुद्दीन हमीद कोकणी यांना भाडेतत्वावर दिला होता .परंतु याकुब अब्दुल शेख व शरीफ अब्दुल कोकणी यांनी खोत यांच्या भाडेकरूकडून सदर प्लॉट ५०० किमतीच्या स्टम्प पेपरवर कायम विक्री करारनामा म्हणून लिहून घेतला.
हे कायदेशीर नसल्याने याबाबतची तक्रार २०१५ मध्ये करण्यात आली होती.याच इसमांनी पुन्हा २०२५ मध्ये याच प्लॉटवर शेड ठोकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.व याबाबतची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.याची चौकशी चालू असतांना याकुब अब्दुल शेख व शरीफ अब्दुल कोकणी यांनी साठेखत करारनाम्याची झेरॉक्स सादर केली. या साठेखताबद्दल संशय आल्याने स्वाक्षरी पडताळणीसाठी फॉरेन्सिक कन्सल्टन्टकडे पाठविण्यात आली.त्यांच्या अहवालानुसार या सह्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले. या बनावट साठेखताविरोधात तसेच अवैध कब्जा विरोधात हॉटेल व्यावसायिक अमित खोत यांनी तक्रार दाखल केली आहे.