नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बनावट कागदपत्राच्या आधारे कराराने घेतलेल्या ट्रस्टच्या जागेत बेकायदा बांधकाम करून ते विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शरणपूर भागात घडला असून याबाबत दहा जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमचंद शिंदे, नंदकुमार रणभिसे, मिनाक्षी येवले,संजय येवले, शेखर उगले,राधिका उगले प्रदिप कांबळे,प्रमोद शिंदे पदमाकर शिंदे व सिमा शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रूपक सुरेश शेळके (रा.रचना शाळेजवळ,शरणपूर) यानी फिर्याद दिली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील शरणपूर गावठाण येथील सिटी सर्व्हे नं. ६८९५ वरल प्लॉट नं. ५० क्षेत्र ४५४ चौमी मिळकत नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोशिएशन प्रा.लि. या कंपनीने सन. १९९० मध्ये प्रेमचंद शिंदे यांना ५० वर्षाकरीता भाडेकराराने दिली आहे.
या मिळकतीचा भाडेकर संपण्यापूर्वीच संशयितांनी संगनमत करून असायमेन्ट डिड तयार करून कोणताही आधार नसतांना त्याद्वारे ९९ वर्षासाठी मिळकतीचे हक्क शिंदे यांच्या मुलांना हस्तांतर केले. मुलांनी कंपनीची संमती न घेता विकसन करारनामा केला. विकसन करारनाम्यामध्ये प्रदिप कांबळे यांना चेअरमन असल्याचे भासवून संमती देणारा ठराव व नाहरकत प्रमाणपत्र दिले. नमुद बनावट व खोटे बेकायदेशीर दस्त खरे आहेत असे भासवून संबधीतांनी मिळकत विकसीत केली. त्यातील काही बांधकाम क्षेत्र विक्री करून कंपनीची फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संजोग टिपरे करीत आहेत.