नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर औद्योगीक वसाहतीतील कामगारनगर भागात राहणा-या ४५ वर्षीय व्यक्तीची महामार्गावरील विल्होळी शिवारात निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. अनैतिक संबधातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून, शहर पोलीसांनी कार्चुली तळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथून एकास अटक केली आहे. याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने केली.
शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (२७ रा. संघर्ष नगर विल्होळी ता.जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. विल्होळी येथील महामार्गाला लागून असलेल्या जैन मंदिर परिसरातील टेकडी भागात सुरज उर्फ पप्पू काशिनाथ घोपरडे (रा.कामगारनगर सातपूर) या व्यक्तीचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१३) उघडकीस आला. याप्रकरणी नाशिक तालूका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामिण पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असतांना युनिट १ अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलीसांच्या हाती लागला. संशयित शशिकांत गांगुर्डे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केली असून तो कार्चुली गावात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने त्र्यंबक तालूक्यातील कार्चुली तळेगाव गाठून बुध्दविहार परिसरात संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली असून त्यास तालूका पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे बोलले जात असून ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत,सुदाम सांगळे हवालदार महेश साळुंके अंमलदार नितीन जगताप,राहूल पालखेडे,आप्पा पानवळ,मुक्तार शेख,धनंजय शिंदे,जगेश्वर बोरसे व चालक सुक्राम पवार आदींच्या पथकाने केली.









