नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पुढे खून झाला आहे अशी बतावणी करीत तोतया पोलीसांनी एका वयोवृध्द सेवानिवृत्तास लुटल्याची घटना पेठरोड भागात घडली. या घटनेत वृध्दाची सोन्यांची अंगठी व खिशातील दहा हजाराची रोकड काढून घेत भामट्यांनी पोबारा केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम रंगनाथ गायकवाड (७६ रा.विश्रामबाग पाडा,कसबे वणी बिरसा मुंडा चौक ता.दिंडोरी) या सेवानिवृत्त वृध्दाने याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड गेल्या शुक्रवारी (दि.९) शहरात राहणाºया नातेवाईकांकडे आले होते. सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी ते घराबाहेर पडले असता ही घटना घडली. पेठरोडवरील बंद पडलेल्या पेट्रोल पंप परिसरातील एका झाडा खाली ते थांबलेले असतांना सफारी परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले.
पोलीस असल्याचे सांगून भामट्यांनी पुढील गल्लीत खून झाला असल्याची बतावणी करीत गायकवाड यांची अंगझडती घेतली. यावेळी हातचलाखीने गायकवाड यांच्या हातातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी व खिशातील दहा हजार रूपयांची रोकड काढून घेत भामट्यानी पोबारा केला असून अधिक तपास हवालदार किरण सानप करीत आहेत.









