नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर येथील एरंडवाडीत कुठलेही कारण नसतांना एका मद्यपीने ३१ वर्षीय व्यक्तीस बेदम मारहाण केली. या घटनेत धारदार वस्तू डोक्यात मारण्यात आल्याने सदर व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयू गायकवाड (रा.एरंडवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याबाबत सुधीर विजयबहादुर सहाणी (३१ रा.एरंडवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सहाणी रविवारी (दि.११) सायंकाळी आपल्या घरात असतांना दारूच्या नशेत असलेल्या संशयिताने आवाज देवून त्यांना घराबाहेर बोलावून घेतले. यावेळी संतप्त संशयिताने कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत सहाणी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
पतीच्या आवाजाने सहाणी यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या बचावासाठी धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले असून या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत सहाणी याच्या डोक्यात व गालावर धारदार शस्त्राने वार केले असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत.