नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून गर्दीची संधी साधत भामटे प्रवास्यांचे अलंकार हातोहात लांबवित आहेत. शनिवारी (दि.२८) ठक्कर बाजार बसस्थानकात वेगवेगळया ठिकाणच्या बसमध्ये चढतांना मोखाडा ता.पालघर येथील महिलेच्या दागिण्यांसह कुटूंबियास बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेल्या व्यक्तीची सोनसाखळी भामट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोखाडा ता.पालघर येथील रूपाली सचिन वैद्य या पुणे येथे गेल्या होत्या. शनिवारी (दि.२८) दुपारी त्या नाशिकला परतल्या असता ही घटना घडली. मोखाडा येथे जाण्यासाठी त्या सायंकाळच्या सुमारास ठक्कर बाजर बसस्थानकात गेल्या होत्या. बसमध्ये चढत असतांना गर्दीत त्यांच्या गळयातील सोन्याचा गोफ व मंगळसुत्र असा सुमारे १ लाख ७ हजार ८१८ रूपये किमतीचे अलंकार भामट्यानी हातोहात लांबविले.
दुसरी घटना याच बसस्थानकात दुपारच्या सुमारास घडली. पंकज अभिमन्यु बागुल (रा.श्रीरामनगर,कोणार्क नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बागुल शनिवारी (दि.२८) कुटूंबियांना सोडण्याताठी ठक्कर बाजार बसस्थानकात आले होते. ताहराबाद येथे जाण्यासाठी ते एमएच २० बीएल १३९१ या नवापूर साक्री बसमध्ये कुटूंबियांसाठी जागा सांभाळण्यासाठी चढले असता ही घटना घडली. बसला गर्दी असल्याने ते जागा सांभाळण्यासाठी बसमध्ये चढले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २२ हजार ५०० रूपये किमतीची सोनसाखळी हातोहात लांबविली. दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार साबळे व गांगोडे करीत आहेत.