नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा भामटा पोलीसांच्या हाती लागला असून, चोरट्या त्रिकुटाने दोन मोटारसायकली चोरी करीत नाशिकसह पुणे आणि कर्जत येथे धुमाकूळ घातल्याचे पुढे आले आहे. पोलीस तपासात संशयितांनी शहरात सात, पुण्यातील चिचंवड भागात दोन तर कर्जत येथे एक गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सहा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२० रा. गोवर्धनगाव गंगापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गंगापूररोडवरील केबीटी सर्कल भागात रविवारी (दि.४) धावत्या दुचाकीवरील महिलेच्या गळ््यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले होते. याबाबत रोहिणी पदमाकर पाटील (रा.तारवालानगर दिंडोरीरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस चोरट्यांचा माग काढत असतांना अंमलदार राकेश राऊत व तुळशिदास चौधरी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर येथील तुकाराम गार्डन भागात अंड्या शार्दुल या संशयिताच्या पोलीसानी मुसक्या आवळल्या असता अल्पवयीन काजीम उर्फ बब्बा समवेत चैनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली. पोलीस तपासात त्याने बब्बा सोबत गेल्या काही महिन्यात मखमलाबाद शिवारात दोन महिलांच्या गळ््यातील अलंकार ओरबाडल्याचे सांगितले. सदरचे दागिणे विसंबा नामक दुसºया अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने विलास प्रमोद विसपुते (रा.त्रिमुर्तीचौक, सिडको) या सराफास विक्री केले असल्याची माहिती दिली. पोलीसांनी सराफास गाठून त्याच्या ताब्यातून ३ लाख ९५ हजार ७०० रूपये किमतीची सोन्याची लगड हस्तगत केली असून या चोरट्यानी कर्जत येथून दुचाकी चोरी करून हे गुन्हे केल्याचे उघड झाल्याने गुह्यात वापरलेली सुमारे एक लाख रूपये किमतीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सराफास दागिणे विक्री करणा-यी विसंबा याच्या चौकशीत त्याने वरिल साथीदारांच्या मदतीने सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकल चोरी करीत मुंबईनाका १ उपनगर २ , नाशिकरोड १ आणि चिंचवड हद्दीतही दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या अटकेने चैनस्नॅचिंगचे आठ व मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून संशयितांच्या ताब्यातून सुमारे सहा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथखाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील,हवालदार गिरीष महाले,रविंद्र मोहिते अंमलदार राकेश राऊत,तुळशीदार चौधरी,गोरख साळुंके,सोनू खाडे,मच्छीद्र वाघचौरे,सुजित जाधव,मुकेश गांगुर्डे, भागवत थविल,तुषार मंडले आदींच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक भटू पाटील करीत आहेत.