नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरगुती पाण्याची टाकी साफ करीत असताना इलेक्ट्रीक मोटारचा शॉक लागल्याने ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना स्वामी समर्थ नगर भागात घडली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार परेश अशोक सोनवणे (३२ रा.उत्तमनगर,सिडको) असे मृत कामगाराचे नाव आहे. सोनवणे पाणी टाकी साफ करण्याचे काम करतात. गेल्या शनिवारी (दि.३) दुपारच्या सुमारास ते आडगाव शिवारातील स्वामी समर्थ नगर भागात कामानिमित्त गेले असता ही घटना घडली. साई गणेश रो हाऊस येथील घरगुती पाण्याची टाकी साफ करीत असतांना अचानक इलेक्ट्रीक मोटारीचा वीज प्रवाह पाण्यात उतरल्याने ही घटना घडली.
गंभीर अवस्थेत सोनवणे यांना तात्काळ लोकमान्य हॉस्पिटल मार्फत रविवारी आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले असता बुधवारी (दि.७) उपचार सुरू असतांना डॉ. सौरभ तामणे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ. प्राजक्ता देवरे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.