नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बिल्डींग मेन्टेनन्स बाबत विचारपूस केल्याने सोसायटी चेअरमनसह एकाने सभासदास मारहाण केल्याची घटना अंबड लिंकरोडवरील दातीरनगर भागात घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात सदस्य जखमी झाला असून त्याच्या भावासह संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश पवार व सचिन वाघ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय पांडूरंग पाटील (रा.स्वराज अपा.सुमित कंपनी समोर) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील व संशयित एकाच बिल्डींगमधील रहिवासी असून राकेश पवार हा सोसायटीचा चेअरमन आहे. रविवारी (दि. ४) रात्री सर्व सदस्य आपल्या सोसायटीच्या आवारात गप्पा मारत असतांना जखमी पाटील यांनी मेन्टेनन्सच्या ५० लाख रूपयांबाबत विचारणा केली असता ही घटना घडली.
संतप्त दोघानी पाटील यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. यावेळी राजेंद्र पाटील हा त्यांचा भाऊ मदतीला धावून आला असता त्यांनाही संशयितांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.