नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी आठ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव,उपनगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली रविंद्र पैठणकर (रा.सिमारतन संकुल बडदेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पैठणकर यांच्या आडगाव शिवारातील कोणार्क नगर २ येथील नवीन घरी ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी ३० एप्रिल ते ५ मे दरम्यान पैठणकर यांच्या महादेव रो हाऊस क्र. १९ या नवीन घराचा कडी कोयंडा तोडून घरातील एलईडी टिव्ही, पुजेचे साहित्य तसेच वास्तू शांती निमित्त मिळालेल्या भेटवस्तू असा सुमारे ८३ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राकेश बनकर करीत आहेत.
दुसरी घटना कामटवाडा भागात घडली. याबाबत मंगेश वसंतराव चंद्रात्रे (रा.कुलस्वामीनी, शिवपार्वती पार्क इंद्रनगरी कामटवाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चंद्रात्रे कुटूंबिय शुक्रवारी (दि.२) दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर सर्व सामानाची उलथा पालथ करी बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ५६ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घुणावत करीत आहेत.
तिसरी घटना जेलरोड येथील भिमनगर भागात घडली. सुप्रिया साहेबराव आहिरे (रा.योगेश्वर अपा.बेला डिसुझारोड भिमनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहिरे या गेल्या १९ नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेल्या असता विनोद पवार,प्रणय पगारे,अरूण पगारे, श्रृतीका पगारे आदींनी बंद घराचे कुलूप तोडून संसारोपयोगी साहित्यासह कागदपत्र असा सुमारे २ लाख ६१ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. तसेच घरात बेकायदा अतिक्रमण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बर्वे करीत आहेत.