नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दुचाकीस्वार टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडाळागावातील खंडोबा चौकात घडली. या घटनेत धारदार कोयत्याने वार करण्यात आल्याने ३० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौसिफ, जावेद बाबा, सोनू व इतर चार ते पाच अनोळखी इसम अशी हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. याबाबत आलम मकसुद खान (३० रा. महाराष्ट्र किराणा दुकानासमोर,खंडोबा चौक वडाळागाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. खान शनिवारी (दि.३) रात्री आपल्या घरी असतांना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने आवाज देवून त्यांना घराबाहेर बोलावले. यावेळी संतप्त टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ व दमदाटी करीत आलम खान या युवकावर धारदार कोयत्याने वार केले.
या घटनेत खान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.