नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियासह नातेवाईकांनी रूग्णालयात राडा घातल्याची घटना आडगाव मेडिकल कॉलेज येथे घडली. या घटनेत उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत संतप्त टोळक्याने डॉक्टरांसह रूग्णालयीन कर्मचा-यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की व मारहाण केली असून, यात रूग्णालयातील सामानाची नासधुस करीत काचाही फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माया दत्तात्रेय कोकाटे, दत्तात्रेय कोकाटे, बाळू शिंदे, विकास शिंदे, भारती बोरूडे, दिलीप शिंदे व अन्य ४ ते ५ जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. कल्पना सतिश देवने यांनी फिर्याद दिली आहे. सायाळे ता. सिन्नर येथील तुषार दिलीप शिंदे या तरूणाचा गेल्या १६ एप्रिल रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला होता. त्यात तातडीने मुंबईनाका परिसरातील श्रीजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी अधिक उपचारार्थ त्यास आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले असता ही घटना घडली.
आडगाव मेडिकल कॉलेज येथील अतिदक्षता विभागात गेली चार दिवस उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.२) उपचार सुरू असतांना तुषार शिंदे याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रूग्णास मयत घोषीत करताच संशयितांनी गोंधळ घातला. कुटुंबियांसह नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे तुषारचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत रूग्णालयात गोंधळ घातला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसह त्यानी रूग्णालयीन कर्मचा-यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत मारहाण केली. या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने रूग्णालयातील काही वस्तूंची तोडफोड केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास हवालदार समर्थ राजूळे करीत आहेत.