नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धागुर ता.दिंडोरी येथील अरूण विठ्ठल लहांगे हे गुरूवारी (दि.१) सायंकाळी कामानिमित्त शहरात आले होते. दिंडोरीरोडवरील भाजीमार्केट यार्डातील साईधन कंपनी समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ ईजे ५७६४ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुलकर्णी करीत आहेत.
दुसरी घटना म्हसरूळ लिंकरोड येथे घडली. रोहित पदमाकर भोये (रा.वृदांवन प्लाझा, सोहम मिसळ जवळ, म्हसरूळ लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भोये यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एचपी ६८७८ बुधवारी (दि.३०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
तिसरी घटना चेहडी येथे घडली. सागर सुभाष लाखे (रा.पेखळे मळा,चेहडी बु. ना.रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. लाखे गेल्या रविवारी (दि.२०) परिसरातील जिजामाता चौक भागात गेले होते. चौकात पार्क केलेली त्यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ एफएच ७८८१ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.