नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– किरकोळ कारणातून बेदम मारहाण करीत रिक्षाचालकावर दुचाकीस्वार टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना अशोकनगर भाजी मार्केट चौफुली भागात घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय बाळू ओतारी (४० रा.धर्माजी कॉलनी,शिवाजीनगर) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. ओतारी शुक्रवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास एमएच १५ ईएच ३३९७ ही रिक्षा घेवून शिवाजीनगरकडून सातपूरच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली. अशोकनगर भाजी मार्केट चौफुली परिसरात पाठीमागून आलेल्या अॅक्टीव्हाने रिक्षास धडक दिली. ओतारी यांनी रिक्षा थांबविली असता अॅक्टीव्हावर ट्रिपलसिट प्रवास करणा-या टोळक्याने त्यांना घेरून का रे रिक्षा चालविता येते का? असा सवाल उपस्थित करीत ओतारी यांना शिवीगाळ करीत टोळक्याने मारहाण केली.
या घटनेत एकाने कमरेला लावलेले धारदार शस्त्र काढून ओतारी यांच्यावर सपासप वार केले असून त्यात ते जखमी झाले आहेत. अधिक तपास जमादार मुसळे करीत आहेत.