नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारखान्यात काम करणा-या सहाय्यक लेखापालाने ५ लाख १० हजाराचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कामगार पुरवणा-या फर्मची रक्कम अदा केल्याचे भासवून भामट्याने सदरची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वर्ग केली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र मिस्तरी (रा.सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लेखापालाचे नाव आहे. याबाबत कंपनीचे सुनिल पवार (रा.अशोकनगर सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित अंबड औद्योगीक वसाहतीतील इफिशीएंट मेथड या कारखान्यात सहाय्यक लेखापाल पदी कार्यरत असून त्याने ५ ऑगष्ट २०२३ ते ६ ऑगष्ट २०२४ दरम्यान हा अपहार केला. या कारखान्यास दीप इंटरप्रायजेस ही फर्म कंत्राटी कामगार पुरविते.
या फर्मच्या कामगारांचे बिल अदा केल्याचे भासवून भामट्याने कंपनीच्या एचडीएफसी बँकेच्या अकाऊंटवर बेनिफीशरीज अॅड करून त्यात स्व:ताच्या एसबीआयव कोटक महेंद्रा बँकेचे अकाऊंट अॅड करून स्व:ताच्या फायद्यासाठी कंपनीचे ५ लाख १० हजाराची रक्कम ट्रान्सफर करून फसवणुक केली. हा प्रकार लेखापरिक्षणात उघड झाल्याने कंपनीच्या वतीने पोलीसात धाव घेण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.