नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून, तरूणीस लग्नाचे आमिष दाखवत एकाने बलात्कार केला तर वेगवेगळया भागात राहणा-या दोन युवतींचा परिचीतांनी विनयभंग केल्याच्या घटना घडल्या. त्यात एका अल्पवयी मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर, पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे मनिष लोखंडे (रा.श्रध्दागार्डन जवळ) नामक युवकाशी सन.२०१५ पासून प्रेमसंबध आहे. या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेला वेगवेगळया ठिकाणी घेवून जात अनेकवेळा बलात्कार केला. युवतीच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केल्याने तिने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला असता ही घटना घडली. संशयिताने जातीवाचक शिवीगाळ करून लग्नास नकार दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख करीत आहेत.
विनयभंगाचा पहिला प्रकार हिरावाडीत घडला. १६ वर्षीय पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. नाझीम उर्फ नासिर मुल्ला या शेजा-याने तिचा विनयभंग करीत नाहक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मार्च महिन्यात अल्पवयीन मुलगी संशयिताच्या घरात जेवण देण्यासाठी गेली असता त्याने विनयभंग केला. याबाबत वाच्यता केल्यास वडिल व बहिणीस जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे मुलीने याबाबत वाच्यता केली नाही. मात्र यानंतर संशयित तिच्यावर पाळत ठेवून मोबाईलवर बोलण्यास भाग पाडत असल्याने पिडीतेने याबाबत पोलीसात धाव घेतली असून याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.
दुसरी घटना दसक येथे घडली. पीडिता व तिचा पती मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास आपल्या घरात असतांना शेजारी राहणा-या तेजस गांगुर्डे, मंथन मोरे,शैला मोरे व भूमी मोरे आदींनी त्यांच्या घरात बेकायदा प्रवेश केला. यावेळी संशयितांनी आईला का मारले याबाबत जाब विचारत दांम्पत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत मंथन मोरे याने महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.