नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कट मारल्याच्या वादातून कारमधून उतरलेल्या दोघांनी बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना महामार्गावरील आडगाव टी पॉईंट भागात घडली. या घटनेत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने चालकास बेशुध्द अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न व शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा रमेश वळवी (३८ रा. नाला अंमलपाडा ता.तळोदा जि. नंदूरबार ) असे जखमी बसचालकाचे नाव आहे. याबाबत वाहक अशोक विजय भिल (रा.नेर ता.जि.नाशिक) यानी फिर्याद दिली आहे. वळवी व भिल एस.टी महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कार्यरत असून बुधवारी (दि.३०) दोघे अक्कलकुवा नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. ठक्कर बाजार बसस्थानकातून सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एमएच २० बीएल २४९९ ही बस परतीच्या प्रवासास लागली होती.
आडगाव टी पॉईंट भागातील प्रताप ढाबा व करण हॉटेल समोर पाठीमागून आलेली एमएच १५ जीए ६९८४ वरिल चालकाने कार अडवी लावून प्रवाश्यांनी भरलेली बस थांबविली. कारमधून उतरलेल्या दोघांनी चालकास बसखाली खेचत कट का मारला या कारणातून वाद घालत चालकास रोडवर खाली पाडत लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली. या घटनेत चालक वळवी बेशुध्द पडल्यानंतर भामट्यांनी पोबारा केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काळे करीत आहेत.