नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून शहरातील दोघा ब्रोकरांसह सायबर भामट्यांनी गुंतवणुकदारांना लाखोंना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वेगवेगळया दोन घटनांमध्ये तब्बल ३७ लाख रूपयांना गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली आणि सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार होलाराम कॉलनीत राहणा-या गिरीश चंद्रकांत कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कांबळे यांना प्रतिक विकास वैद्य (रा.हॉटेल कामत शेजारी नाशिक पुणारोड) व विवेक खोंडे (रा.वडजाई मातानगर पंचवटी) या शहरातील ब्रोकरांनी गंडविले आहे. संशयितांनी १ मे २०२२ रोजी कांबळे यांची एम.जी.रोड येथील पारख इलेक्ट्रॉनिक या दुकान परिसरात भेट घेत विश्वास संपादन केला. यावेळी शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवत भामट्यांनी कांबळे यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. काही काळ परताव्याची रक्कम देत नंतर गुंतवणुकीची रक्कमही देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संबधीताकडून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने कांबळे यांनी पोलीसात धाव घेतली आहे. यात विवेक खोंडे यांनी २९ लाख १६ हजार ३०० रूपयांची तर वैद्य याने ९० हजार अशी सुमारे ३० लाख ६ हजार ३०० रूपयांची कांबळे यांची फसवणुक झाली आहे.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत. तर शहरातील ३५ वर्षीय व्यक्तीची सायबर भामट्यांनी फसवणुक केली. वेगवेगळया व्हाटसअप क्रमांकावरून जानेवारी महिन्यात तक्रारदाराशी संपर्क साधण्यात आला होता. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी तक्रारदार यांना गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन होताच तक्रारदारास वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून भामट्यांनी ही फसवणुक केली. या घटनेत तब्बल सात लाख रूपयांची फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.