नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गांजा या अमली पदार्थाची विक्री करणारे दोघे पोलीसांच्या जाळयात अडकले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपोवन लिंकरोड भागात केली. या कारवाईत संशयितांचे दोन अन्य साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर सोमनाथ बलसाने (२६ रा.नाशिक सेंट्रल मार्केट,मातंगवाडा) व सनी किशोर देवाडिगा (३० रा.मधली होळी जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. पथकाचे अंमलदार बाळा नांद्रे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपोवन लिक रोड भागातील पंचशिलनगर येथील सबस्टेशन भागात गांजा विक्रेते असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.२९) पथकाने धाव घेत दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचा १५ किलो १६१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
संशयितांच्या ताब्यातून गांजाची पिशवी हस्तगत करण्यात आली असून पोलीसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. संशयिताविरोधात यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे व अंकुश चिंतामन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे हवालदार भारत डंबाळे,बळवंत कोल्हे अंमलदार अनिरूधद येवले,बाळासाहेब नांद्र चंद्रकांत बागडे,अविनाश फुलपगारे व अर्चना भड आदींच्या पथकाने केली.