नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे प्रकार वाढले असून रविवारी (दि.२७) वेगवेगळया भागात राहणा-या तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तिघींनाही कुणी तरी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी मुंबईनाका,भद्रकाली व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उंटवाडी रोड भागात राहणारी अल्पवयीन मुलगी रविवार सायंकाळ पासून बेपत्ता आहे. कुणास काही एक न सांगता ती घरातून निघून गेली असून सर्वत्र शोध घेवूनही मिळून न आल्याने कुटुंबियांनी पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
दुसरी घटना अमरधाम रोड भागात घडली. अमरधामरोड भागात राहणा-या अल्पवयीन मुलीस देविदास कुमावत या युवकाने पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
तिसरी घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. अल्पवयीन मुलगी गेल्या शुक्रवार (दि.२४) पासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.