नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चालकासह कामगारास अपहरणानंतर डांबून ठेवत वाहन मालकाकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पिकअप मालवाहू वाहन पेटवून देत कामगारांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी तिघा खंडणीखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
किरण चंदू च्हाण (२३), मयुर अंकुश ढाकणे (१९ रा.अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड) व ओम बजरंग पवार (२१ रा. सामनगावरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून याबाबत देव विनायक शिंदे (२३ रा.शेवगेदारणा – नाणेगाव ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार शिंदे पिकअप चालक असून तो रविवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास सहकारी अजय पाळदे यास सोबत घेवून चेहडी गावातील बोराडे यांच्या मळया शेजारील मशिद भागात आपले वाहन घेवून गेला असता ही घटना घडली.
परिचीत असलेल्या संशयितांनी शिदे व पाळदे याना गाठून वाहनासह अपहरण केले यानंतर दोघांना डांबून ठेवत त्यांनी शिंदे याच्या मोबाईलवरून वाहन मालक अविनाश पाळदे यांच्याशी संपर्क साधत ५० हजार रूपयांची खंडणी मागितली. तुझी गाडी आमच्या एरियात चालते तू पैसे दिले नाही तर दोघा कामगारांना जीवे मारून गाडी पेटवून देवू अशी धमकी दिली. भेदरलेल्या पाळदे यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने संशयितांना अटक करण्यात यश आले असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.