नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या पाच घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ९ लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश असून याप्रकरणी आडगाव, गंगापूर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माडसांगवी ता. जि. नाशिक येथील अॅड. सचिन टिळे व त्यांचे नातेवाई आपल्या परिवारासह पंढरपूर,तुळजापूर व कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.२६) रात्री अॅड. टिळे यांचा मंदाकिनी बंगला आणि शेजारी राहणारे मामा भाऊसाहेब पेखळे यांचे घर फोडून सुमारे ४ लाख ८९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर दिवसी सात नंबर चारी जवळील सांगळे फार्म हाऊस फोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ३० हजाराची रोकड व सोन्याची पोत असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. याबाबत प्रकाश पुंडलिक घुगे (रा.हनुमाननगर पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. तिन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे व हवालदार देसाई करीत आहेत.
चौथी घटना गंगापूर येथे घडली. किशोर भगवान पाटील (रा.एसबीआय बॅकेमागे गंगापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील कुटुंबिय दोन दिवस बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअरचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरराव करीत आहेत.
पाचवी घटना पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर भागात घडली. संदिप प्रकाश जाधव (रा.पांडूरंग चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव कुटूंबिय गेल्या गुरूवारी (दि.२४ ) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ८९ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.