नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील गोडावून फोडून कॉपर केबल चोरी करणा-या पाच जणांच्या टोळीस बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे. या टोळीत रिक्षाचालकासह केबल जाळून काढलेली कॉपर वायर खरेदी करणा-या भंगार व्यावसायीकाचाही समावेश असून या कारवाईत संशयितांच्या ताब्यातील सुमारे तीन लाख १० हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने केली.
सुखदेव उर्फ हरी संतू झोले (४५),कृष्णा पांडूरंग वाकळे (२६ रा. महालक्ष्मी चौक प्रबुध्दनगर सातपूर), योगेश विजय मराळ (३६ रा. गावपाचाळी ता.त्र्यंबकेश्वर),संजय पांडूरंग सकट (२० रा.सोनाली वॉईन शॉप मागे, समाज मंदिरामसोर अंबड ) व रिक्षाचालक प्रमोद संपत म्हस्के (३२ रा.स्वेता प्राईड लक्ष्मीनगर,स्वामीनगर अंबड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. संदिप उत्तम कारे (रा.अंबिकानगर,डीजीपीनगर अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अंबड औद्योगीक वसाहतीतील डीएस केबल अॅण्ड स्विच गेअर येथे ही घटना घडली होती.
अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.२०) शकुंतला प्लाझा येथील कंपनी व शेजारील गोडावून मधून ६-४ कॉपर अरमाड चे ८० मिटर लांबिचे व ४० किलो वजनाचे सुमारे २५ हजार रूपये किमतीचे वायर बंडल असा सुमारे सात लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेची दखल घेत पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रीक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात असतांना युनिटचे उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी व प्रकाश महाजन यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.