नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून सात मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. त्यातील एक मोटारसायकल चालकास मारहाण करीत भामट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी आडगाव, सातपूर,अंबड,सरकारवाडा नाशिकरोड व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतधाम भागात राहणारे योगेश माधव कळंबे हे गेल्या रविवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास दुचाकीस पेट्रोल भरण्यासाठी परिसरातील कुमोद पेट्रोल पंपावर गेले होते. पेट्रोल भरून ते आपल्या अॅक्टीव्हाने एमएच १५ एचएक्स १९६६ घराकडे परतत असतांना ही घटना घडली. आंबेडकर चौकाच्या पुढील इंदिरा हाऊस बिल्डींग समोर पाठीमागून भरधाव आलेल्या मोपेडने कळंबे यांच्या दुचाकीस धडक दिली. यानंतर सदर दुचाकीवरील तिघानी कळंबे यांची कुठलीही चुकी नसतांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता भामट्यांनी कळंबे यांची दुचाकी घेवून पोबारा केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
दुसरी घटना गंगपूररोड भागात घडली. दुर्गेश आनंदा जाधव (२२ रा. तारा अपा. समर्थ लॅबरेरी,प्रमोदनगर गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांची स्प्लेंडर एमएच ४१ एजे ०१३४ गेल्या शुक्रवारी रात्री त्यांच्या तारा अपार्टेमेंटच्या पार्किग मध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.
तिसरी घटना पंडीत कॉलनीत घडली. विनोद जगन कंडारे (रा.गुरेवाडी शास्त्रीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कंडारे गुरूवारी (दि.१७) पंडीत कॉलनीत गेले होते. महापालिका कार्यालयासमोर लावलेली त्यांची एमएच १५ एफझेड ४६२१ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.
चौथी घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. विशाल साहेबराव आहेर (रा.मोंढे हॉल शेजारी उत्तमनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर यांची पल्सर एमएच ४१ बीएम १२१७ मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.२०) त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार संगम करीत आहेत.
पाचवी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. याबाबत विशाल दिलीप सोनवणे (रा.अहिल्याबाई होळकर चौक) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफझेड २१५४ गेल्या गुरूवारी (दि.१०) महेंद्रा कंपनीच्या मेटेरियल गेट भागात लावलेली असतांना ती चोरट्यानी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.
सहावी घटना देवळाली गावात घडली. बॉबी सुनिल रेवगडे (रा.रेवगडे चाळ पाटील गॅरेज मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रेवगडे यांची एमएच १५ एचडी ३९७० मोटारसायकल गुरूवारी (दि.२४) रात्री त्याच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. तर संतोष बाबुराव डावरे (रा.पंचक गाव जेलरोड) हे सोमवारी (दि.२१) सकाळी बिटको चौकात गेले होते. उड्डाणपूलाखाली पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ डीए ५५४७ चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.