नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कांदा बटाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना तोतया पोलीसांनी लुटल्याची घटना पेठरोडवरील आरटीओ परिसरात घडली. या घटनेत भामट्यानी अंगझडती घेत एकाच्या खिशातील तीस हजार रूपयांची रोकड लांबवली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादू चिमना भुसारे (५५ रा.करंजाळी ता.पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भुसारे गुरूवारी (दि.२४) सकाळी मित्र यशवंत मल्हारी चौधरी (रा.साबरपाडा ता.पेठ) यांना सोबत घेवून कांदा बटाटा खरेदीसाठी शहरात आले होते. बसचा प्रवास करून दोघे मित्र आरटीओ परिसरातील शारदा हॉस्पिटल समोरून शरद चंद्र मार्केट यार्डाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली.
रस्त्याने दोघे मित्र पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या दोघांनी त्यांची वाट अडविली. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी चेकिंगच्या बहाण्याने दोघा मित्रांची अंगझडती घेतली. यावेळी भुसारे यांच्या खिशातील बटाटे खरेदीसाठी आणलेली तीस हजाराची रोकड काढून घेत भामट्यांनी आरटीओ सिग्नलच्या दिशेने दुचाकीवर पोबारा केला. अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.