नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवीन इमारतीत फर्निचरचे काम करणा-या परप्रांतीयाने साफसफाई करणा-या महिलेचा विनयभंग केल्याची घटना जनरल वैद्यनगर भागात घडली. लाकडी पाट देण्याचे आमिष दाखवून संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण भारती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार जनरल वैद्यनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हा प्रकार घडला. बुधवारी (दि.२३) सकाळी महिला इमारतीत साफसफाई करण्यासाठी गेली होती. पहिल्या मजल्यावरील जीना झाडत असतांना याच मजल्यावरील एका सदनिकेत फर्निचरचे काम करणा-या संशयिताने तिला लाकडी पाट बनवून देतो असे आमिष दाखवून महिलेस आपल्या कामाच्या ठिकाणी नेले.
या ठिकाणी त्याने महिलेशी अंगलट करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने कशी बशी सुटका केली असता त्याने पैसे दाखवून महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.