नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बेकायदा सावकारांविरोधात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणातून तिघांनी अश्लिल हाव भाव करीत दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना कॉलेजरोड भागात घडली. या घटनेत केस मागे घ्या नाही तर कुटुंबियांना गायब करून टाकू अशी धमकी देण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश साधवानी,यश साधवानी (रा.दोघे नाशिकरोड) व विनीत राजपाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या मंगळवारी (दि.८) रात्री ही घटना घडली. आकाश साधवानी याने सुनिल भागवत याच्या फोनवरून पीडितेच्या पतीशी संपर्क साधला होता. कैलास कुंडलवाल व रोहित कुंडलवाल या सावकारांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत बोलायचे आहे असे सांगून संशयितांनी दांम्पत्यास कॉलेजरोड येथील चहाची टपरी या हॉटेलवर बोलावले होते. या ठिकाणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्याबाबत दांम्पत्यास सांगण्यात आले.
मात्र दाम्पत्याने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संशयितांनी दाम्पत्यास शिवीगाळ व महिलेशी अश्लिल हावभाव करीत दमदाटी केली. केस मागे घे नाही तर कुटूंबाला गायब करून टाकू अशी धमकी देत दोघांना धक्काबुक्की करीत मारहाण करण्यात आली. दाम्पत्याने काढता पाय घेतला असता संशयितांनी घरी जाण्यास मज्जाव करीत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.