नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहेरून पैसे आणले नाहीत या कारणातून एकाने महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयिताने दमदाटी करीत बळजबरी पीडितेशी लग्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदिप सिताराम सुर्यवंशी असे संशयिताचे नाव आहे. संशयित आणि पीडिता शरणपूररोड भागात शेजारी असलेल्या दोन वेगवेगळया खासगी बँकेत नोकरीस होते. यातून दोघांमध्ये ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली. सेल्स मॅनेजर असलेल्या संशयिताने चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तसेच बँकेत खाते उघडण्याचा बहाणा करून पीडितेचा ई मेल हॅक केला. त्यानंतर ईमेल आयडीचा अॅक्सेस त्याच्या मेलवर घेत गोपनिय माहिती मिळवित हा उद्योग केला.
डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ या काळात संशयिताने पीडितेस दमदाटी करीत तिच्याशी लग्न केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यानंतर मात्र आई वडिलांकडून पैसे आणावेत यासाठी तगादा लावला असता पीडितेने नकार दिल्याने संशयितांने बनावट इन्स्टाग्राम खाते ओपन करून त्या खात्यावर पीडितेच्या संमतीशिवाय तिचे एडीट केलेले फोटो अपलोड करून समाजामध्ये बदनामी केली. अधिक तपास निरीक्षक चव्हाण करीत आहेत.