नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पावधीत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका तरूणास तब्बल ६५ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन वर्ष उलटूनही एक रूपयाही पदरात न पडल्याने गुंतवणुकदाराने अखेर पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश अरविंद पुजारी (रा.काळाराम मंदिराजवळ) व शिवप्रसाद विंधेश्वरी दुबे (रा.शिवाजीनगर,नागपूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत अभिजीत प्रकाश भदाणे (२६ रा.मखमलाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये संशयितांनी भदाणे यांना गाठले होते. म्हसरूळ येथील शिवगंगा नगर येथील कलश अपार्टमधील सदनिकेत बोलावून घेत संशयितांनी वेगवेगळया गुंतवणुकीतून अल्पावधीत भरघोस मोबदल्याचे आमिष दाखविले होते.
संशयितांच्या प्रलोभनाला बळी पडलेल्या भदाणे यांनी दामदुप्पटच्या योजनेत तब्बल ६५ लाख रूपये गुंतवणुक केली. यानंतर मुदत संपल्याने त्यानी पैशांची मागणी केली असता संशयितांनी वेळमारून नेली. त्यानंतर टाळाटाळ करण्यात आल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.