नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येवला तालुक्यातील अंदरसुल येथील फर्निचर दुकान फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेणा-या छत्रपती संभाजीनगर येथील दोघा भामट्यांना बेड्या ठोकण्यात ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. ही कारवाई वाळूंज एमआयडीसी परिसरात करण्यात आली असून संशयितांच्या ताब्यातून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अन्य दोन साथीदारांच्या मदतीने संशयितांनी ही चोरी केली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. चोरी व घरफोडी करण्यात ही टोळी माहिर असून या टोळीच्या् अटकेने जिल्हयातील अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
गुलाम रफीक शेख (४० रा.हिदायतनगर वाळुज बु. छत्रपती संभाजीनगर) व दिपक लाचू ठुणे (१९ रा.वांगेभरारी ता.सिल्लोड छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून संतोष कांबळे व करण कांबळे हे त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकान गेल्या मंगळवारी (दि.१०) रात्री फोडण्यात आले होते. पाठीमागील शटर तोडून चोरट्यांनी विक्रीसाठी ठेवलेले एलईडी टिव्ही,सिलींग फॅन,कुलर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व तांबे पितळाची भांडी असा सुमारे २ लाख ७० हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत येवला तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. येवला पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा चोरट्यांचा माग काढत असतांना छत्रपती संभाजी नगर येथील चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समोर आल्याने पथकांनी वाळूंज एमआयडीसी भागात तळ ठोकत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या असता त्यांनी फरार असलेल्या सराईत संशयितांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेले छोटा हत्ती वाहन,चोरीचे तीन एलईडी टिव्ही, ७७ किलो वजनाची तांब्याची भांडी व १४ किलो वजनाची पितळी भांडी असा सुमारे २ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून फरार असलेल्या दोघा सराईतांचा शोध सुरू आहे.
संशयित हाती लागताच जिह्यातील अनेक गुन्हयाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई अधिक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर मालेगावचे अप्पर अधिक्षक अनिकेत भारती मनमाडचे उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे , येवल्याचे निरीक्षक संदिप मंडलिक,उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर,एलसीबीचे उपनिरीक्षक दत्ता कांभीरे,हवालदार गिरीष निकुंभ,शरद मोगल,योगेश कोळी,हेमत गिलबिले,प्रदिप बहिरम तसेच येवल्याचे अंमलदार राजेंद्र पाटील,राजेंद्र बिन्नर,सचिन वैरागर,दिनकर पारधी,गणेश बागुल,सागर बनकर,नितीन पानसरे,पंकज शिंदे,दिपक जगताप आदींच्या पथकाने केली.