नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नवीन संघटना स्थापन केल्याच्या वादातून चौघांनी एका रिक्षाचालकास जातीवाचक शिवीगाळ करीत दमदाटी केल्याची घटना पेठरोड वरील आरटीओ कार्यालय परिसरात घडली. या घटनेत दोघांनी सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने रिक्षाचालकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश कायस्थ, नितीन रेवगडे,जितेंद्र भाभे (भावे) व चेतन शेवाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत समाधान रमेश आहिरे (रा.शिवाजीनगर सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. आहिरे गेल्या ९ फेब्रुवारी रोजी आरटीओ कार्यालय परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारास ते प्रवेशद्वाराजवळून जात असतांना योगेश कायस्थ व नितीन रेवगडे यांनी त्यांच्याकडे बघून जातीवाचक शब्दप्रयोग करीत काही लोक नवीन संघटना काढतात आणि लोकांना लुटतात असा टोमणा मारला.
याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी कॉलर पकडून दम दिला तर जितेद्र भावे याने अपशब्द वापरून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान याच दिवशी संशयितांनी फेसबुकवर बदनामी कारक व्हिडीओ अपलोड केला तर चेतन शेवाळे यानेही सोशल मीडियावर बदनामी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त पदमजा बढे करीत आहेत.