नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे ३५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यांसह संसारोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोड येथील रत्ना मोहन भगरे (रा.ओंकार बाबा गल्ली फुलेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भगरे कुटुंबिय २ ते ४ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली २० हजाराची रोकड व गॅसची शेगडी व दोन टाक्या असा सुमारे २५ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली. रणजीत गिरीष मांजरेकर (रा.अश्विननगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मांजरेकर कुटुंबिय २ ते ६ सप्टेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या सेफ्टी डोअर व आतील दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. या घरफोडीत चोरट्याच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटिव्ही यंत्रणेचे नुकसान करीत सुमारे दहा हजार रूपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.