नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील दोघांना शेअर मार्केटमधील गुंतवणुक चांगलीच महागात पडली आहे. संबधीतांना सायबर भामट्यांनी तब्बल ५६ लाख रूपयांनी दणका दिला असून त्यातील विविध बँकेत वर्ग करण्यात आलेली ९ लाख ८१ हजार रूपयांची रक्कम पोलीसांना एनसीसीआरपी पोर्टलद्वारे गोठविण्यात यश आले आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महिलेसह एकाशी गेल्या मार्च महिन्यात सायबर भामट्यांनी संपर्क केला होता. अनोळखी व्हाटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करीत भामट्यांनी शेअर्स मार्केट मध्ये विविध कंपन्यांचे स्टॉक आणि आयपीओ मध्ये चांगले रिटर्न मिळत असल्याचे भासविले. दोघे जण गळाला लागताच भामट्यानी २० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान संबधीतांना विविध बँक व वॉलेट खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले.
या घटनेत तक्रारदाराची ५० लाख तर महिलेची सहा लाखांची फसवणुक झाली आहे. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच दोघा गुंतवणुकदारानी पोलीसात धाव घेतल्याने एनसीसीआरपी पोर्टलच्या माध्यमातून विविध बँक खात्यात वर्ग झालेली ९ लाख ८१ हजार रूपांची रक्कम गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.