नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने धुडघूस घातला ही घटना हिरावाडीत घडली असून यात दाम्पत्यास मारहाण करीत टोळक्याने किराणा दुकानात तोडफोड करीत मोठे नुकसान केले आहे. या घटनेत व्यावसायीकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय जोशी, गट्या भाटे,भुषण कोळवणे व त्याचा भाऊ (रा.सर्व जोशीवाडा,पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत योगेश भाऊसाहेब भोये (४० रा.हिरावाडी गावठाण मायको शाळेजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. भोये यांचे हिरावाडीत दिव्यांका नावाचे किराणा दुकान असून रविवारी (दि.१३) सायंकाळी ते आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. संशयित टोळक्याने दुकानात येवून भोये यांच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला.
यावेळी संतप्त संशयित जोशी याने शिवीगाळ करीत भोये यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. या घटनेत भोये जखमी होताच संशयित टोळक्याने दुकानाच्या काऊटरच्या काचा फोडून तसेच सामान अस्ताव्यस्त फेकून नुकसान केले. भोये यांच्या पत्नी आपल्या पतीच्या बचावासाठी धावून आल्या असता त्यांनाही टोळक्याने लाथाबुक्यांनी मारहाण करीत दांम्पत्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत.