नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दवाखान्यात तपासणी करून घराकडे रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सुमारे सव्वा लाखाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना छान हॉटेल परिसरात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पाना प्रमोद बाविस्कर (६४ रा.सावरकरनगर,गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बाविस्कर या सोमवारी (दि.१४) पतीस सोबत घेवून विनयनगर भागातील एका दवाखान्यात गेल्या होत्या. पतीची आरोग्य तपासणी करून त्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घराकडे परतण्यासाठी महामार्गाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली.
नाईन पल्स हॉस्पिटल कडून त्या छान हॉटेलच्या दिशेने कच्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्या त्यांच्या गळयातील सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
चॉपर घेऊन फिरणा-याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीत चॉपर घेवून फिरणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातील धारदार चॉपरसह दुचाकी जप्त करण्यात आली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश अंकुश डोंगरे (रा.घरकुल योजना चुंचाळे शिवार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चॉपरधारीचे नाव आहे. डोंगरे याच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत चॉपर असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१४) सायंकाळी पथकाने त्यास गाठून अंगझडती व दुचाकीची तपासणी केली असता दुचाकीच्या डिक्कीत धारदार चॉपर मिळून आला. संशयितास बेड्या ठोकत पोलीसांनी चॉपरसह दुचाकी हस्तगत केली असून याबाबत अंमलदार अर्जुन कांदळकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.