नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसमध्ये चढतांना वृध्द महिलेच्या बॅगेतील बटवा चोरट्यांनी चोरून नेला. या बटव्यात एटीएम कार्डसह सुमारे सहा लाखाचे दागिणे होते. कार्डचा गैरवापर करीत भामट्यांनी बँक खात्यावरही ड्ल्ला मारल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यमुना संतोष माळी (७० रा.विजय ममता समोर नाशिक पुणा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. माळी दांम्पत्य भुसावळ येथे जाण्यासाठी गेल्या शनिवारी (दि.१२) मेळा बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. सकाळी ८ च्या सुमारास माळी दांम्पत्य भुसावळ येथे जाण्यासाठी नाशिक शेगाव या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी यमुना माळी यांच्या ताब्यातील प्रवासी बॅगची चैन उघडून बटवा चोरून नेला.
या बटव्यात सोन्याच्या बांगड्या, मंगळसुत्र, सोनसाखळी व एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड असा ऐवज होता. भामट्यांनी एटीएम कार्डचा गैरवापर करीत बॅक खात्यातील ३० हजाराची रक्कम परस्पर काढून घेतल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून या घटनेत ६ लाख २५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.