नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धारदार कोयते बाळगणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथक व दहशतवाद विरोधी पथकाने केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शादिक शब्बीर शेख (२१ रा.आयटीआय पुल कांबळेवाडी) व प्रणव उर्फ अमीन तुकाराम बोरसे (३४ रा. साई समृध्दी रो हाऊस वावरेनगर अंबड) अशी संशयितांची नावे आहेत. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शादीक शेख याने अमीन बोरसे यास धारदार कोयते दिल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१४) गुंडा विरोधी व दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त सापळा रचत शादीक शेख याच्या मुसक्या आवळल्या त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने पथकाने प्रणव उर्फ अमीन बोरसे यास बेड्या ठोकत त्याच्या घराची झडती घेतली असता चार धारदार कोयते मिळून आले.
संशयितांना मुद्देमालासह अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,विजय सुर्यवंशी,प्रदिप ठाकरे,गणेश भागवत,अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड,कल्पेश जाधव तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे निरीक्षक शेंडे,सहाय्यक निरीक्षक योगिता जाधव,लवंगे,उपनिरीक्षक काझी,सैय्यद करडेल अमंलदार वडकते,पठाण गांगुर्डे आदींच्या पथकाने केली.