नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामदा एकादशी निमित्त निघणा-या रामरथ व गरूड रथ यात्रेत सहभागी झालेल्या दोन महिलांच्या गळयातील अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. ही घटना गणेशवाडी भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुजा दुर्गेश शिंदे (रा.कृष्णनगर,आडगाव नाका ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिदे या गेल्या मंगळवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास काळाराम मंदिर परिसरातून शहरात निघालेल्या रामरथ व गरूड रथाच्या दर्शनासाठी गेल्या असता ही घटना घडली. गणेशवाडी येथील शनिमंदिर परिसरात त्या गर्दीत दर्शन घेत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १२ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. याच वेळी वर्षा रामदास देवरे यांच्याही गळयातील सुमारे २४ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला असून दोन्ही महिलांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत.
गगापूररोड भागातही चेन स्नॅचरांचा धुमाकूळ
गगापूररोड भागात चेन स्नॅचरांनी धुमाकूळ घातला असून, चोरट्यांचे भलतेच धाडस वाढल्याचे चित्र आहे. आईस्क्रीम घेवून परतणा-या एकाच्या गळयातील सोनसाखळी तर दुस-या घटनेत पती आणि मुलांसमवेत रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र भामट्यानी ओरबाडून नेले. वेगवेगळया ठिकाणी या घटनांबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाईप लाईन रोड भागात राहणारे पवनकुमार बाबुलाल कुमावत (रा. मधुर स्विटसच्या मागे विवेकानंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुमावत गुरूवारी (दि.१०) रात्री आपल्या मुलीस सोबत घेवून नजीक आईस्क्रीम घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. मधुर स्विट दुकानातून आईस्क्रीम घेवून दोघे बापलेक घराकडे परतत असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी कुमावत यांच्या गळयातील सुमारे ६५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून संतकबीरनगरच्या दिशेने पोबारा केला.
दुसरी घटना कॉलेजरोड परिसरातील कृषीनगर भागात घडली. शितल नितीन जाधव (रा.कृषीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शितल जाधव या सोमवारी (दि.७) रात्री पती व मुलांसमवेत नेहमीप्रमाणे परिसरातील जॉगिग ट्रॅकवर गेल्या होत्या. फेरफटका मारून जाधव कुटूंबिय आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. प्रधान पार्क बिल्डींग समोर दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे एक लाख सात हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार मोहिते करीत आहेत.