नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाने दोघा एमडी प्लेडरच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्या ताब्यातून १३ ग्रॅम वजनाच्या अमलीपदार्थासह मोबाईल असा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई नांदूरनाका ते जेलरोड मार्गावरील जनार्दन स्वामी पुल परिसरात करण्यात आली. संशयितांना मुद्देमालासह आडगाव पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.
जय सुनिल फिरके (२५) व अंकुश शांताराम चौधरी (२४ रा. दोघे अश्विनी कॉलनी सामनगावरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित एमडी प्लेडरांची नावे आहेत. युनिट २ चे पथक शुक्रवारी (दि.४) आपल्या हद्दीत गस्त घालत असतांना हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जनार्दन स्वामी पूल परिसरात दोन जण एमडी या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने निळकंठेश्वर महादेव मंदिर भागात सापळा लावला संशयित पोलीसांच्या जाळयात अडकले. दोघांच्या अंगझडतीत ६५ हजार रूपये किमतीचा व १३ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमलीपदार्थ मिळून आला असून या कारवाईत दोघांना बेड्या ठोकत पथकाने मोबाईल व मॅफेड्रॉन असा सुमारे ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना मुद्देमालासह आडगाव पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याप्रकरणी हवालदार फुलमाळी यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ.समाधान हिरे,उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी,जमादार बाळू शेळके,विलास गांगुर्डे,गुलाब सोनार,हवालदार सुनिल आहेर,मनोहर शिंदे,प्रकाश बोडके,प्रकाश महाजन,वाल्मिक चव्हाण अंमलदार प्रविण वानखेडे,संजय पोटींदे,महेश खांडबहाले,सुनिल खैरणार व अमली पदार्थ विरोधी पथकाचे योगेश सानप,चंद्रकांत बागडे आदींच्या पथकाने केली.