नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आर्थिक वादातून तरूणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना मार्च २०२० मध्ये सापगाव ता. त्र्यंबकेश्वर येथील गायराणात झाली होती. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोविंदा सदू दिवे (२७ रा.सापगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कैलास दिवे यांनी फिर्याद दिली होती. गोविंदा दिवे याचा गावातील मृत गोकुळ नामदेव दिवे (२१) याच्याशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्यामुळे गोकुळ याने गोविंदाचा भाऊ भगवान दिवे यास मोटार सायकल घेण्यासाठी हात ऊसनवार दिलेल्या दहा हजार रूपयांची मागणी केल्याने ही घटना घडली होती. वाद झाल्याने गोकुळने पैश्यांची मागणी केली या रागातून सदू मंगळू दिवे (६०),यशवंत सदू दिवे (३०), गोविंदा सदू दिवे (२७) व भगवान सदू दिवे (२५) आदींनी २ मार्च २०२० रोजी मृत गोकुळ दिवे यास सापगाव शिवारातील गायरानात घेवून जात ही हत्या केली होती. दिवे बापलेकांनी गोकुळ यास लाथाबुक्यानी मारहाण केली तर गोविंदा दिवे याने त्याच्यावर धारदार कोयत्याने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर कुटुंबियांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
ही घटना दुस-या दिवशी उघडकीस आल्याने याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात खूनासह विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक आर.टी.कर्पे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला न्या. बी.व्ही.वाघ यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.अनिल बागले यांनी काम पाहिले असता न्यायालयाने गोविंदा दिवे यास दोषी ठरवर त्यास जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली तर उर्वरीत संशयितांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार अमोल आहेर यांनी पाठपुरावा केला.