नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बेकायदा सावकारी करण्याच्या संशयातून पोलिसांनी तेरा ठिकाणी छापे टाकत तब्बल आठ हून अधिक खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल केले आहेत. संबधितांच्या घर व कार्यालयामध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे, धनादेश व अन्य सामान आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईने शासगी सावकारी करणा-यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान नागरीकांनी निर्भयपणे खाजगी अवैध सावकारी व्यवसाय करणा-या इसमाविरूध्द तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी केले आहे.
शुक्रवारी (दि.४) सायंकाळ पासून वेगवेगळया पथकांनी खासगी सावकारांच्या घर व कार्यालयांवर छापेमारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मध्ये काही राजकिय पक्षांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या सहका-यांनी सहकार संस्था उपनिबंधक यांच्या मदतीने ही छापेमारी केली. या मध्ये नैय्या खैरे याच्याकडे छापा टाकला असता १२ करारनामे, १९ धनादेश व २१ लाख ५ हजाराची रोख रक्कम मिळून आली, संजय शिंदे याच्या कडे ८१ कोरे धनादेश, खरेदी खत, सहा लेजर बुक, पैसे मोजण्याचे यंत्र व तीन लाख २० हजार ५०० रूपयांची रोकड आढळून आली.
प्रकाश अहिरे याच्याकडे २३ रजिस्टर कागपत्र, चार लाख ५० हजार रोख, ८८ अमेरीक डॉलर भारतीय मुल्य ७ लाख ५० हजार रूपये , सुनिल पिंपळे याच्याकडे दोन घरे, तीन दुकानांची झडती घेतली. त्यात ११ खरेदी खत, २ साठे खत, १ कब्जा पावती, ५ कोरे स्टँम्प, २४ कोरे धनादेश, दोन हात उसनवार पावत्या, चार लाख आठ हजार रोख रक्कम आढळली. गोकुळ धाडा याच्याकडे ५० उसनवार पावत्या, दोन खरेदी खत, ७० कोरे धनादेश, धनु लोखंडे याच्याकडे ५० खरेदी खत व १२ धनादेश,राजेंद्र जाधव याच्याकडे दोन डाय-या व दोन लाख तीन हजार ३५० रोख रक्कम आढळली. कैलास मैंद याच्या कडे दोन कोरे चेक एक करार, ९ खरेदीखत आढळले. संबधीतावर भद्रकाली,गंगापूर,पंचवटी व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. संबधीत सावकारांपैकी नैय्या खैरे माजी नगरसेवक असून अन्य काही राजकीय पक्षाशी संबंधित आहे.
पोलीसांनी गुरूदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलीयार, सचिन मोरे, रोहित चांडोळे यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली असता अवैध सावकारी व्यवसाय करत असल्याचा पुरावा आढळलेला नाही. या पुढेही कारवाई सुरू राहणार असून नागरीकांनी अवैध व्यवसाय विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात यावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
१३ संशयित सावकारांच्या घरी छापे
नाशिक पोलीसांनी १३ संशयित सावकारांच्या घरी, कार्यलया मध्ये छापा टाकला. या मध्ये आठ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ठिकाणी पंचनामे करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा, दोन्ही परिमंडळाचे विभागीय उपायुक्त, पोलीस ठाणे निहाय अधिकारी, कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त