नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सदनिका खरेदी विक्रीच्या व्यवहारात एकास पावणे तीन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. रिअल इस्टेट एजंट व अन्य तीघांनी कट कारस्थान करून हा गंडा घातला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण विश्वनाथ चिंचोरे (४३ रा. गॅस पंपामागे,गंगापूररोड), जितेंद्र जयवंत शिर्के (५४), भाग्यश्री जितेंद्र शिर्के (५३ रा.दोघे शिळे इलेक्टा प्रा.लि. गॅस पंपामागे गंगापूररोड) व प्रशांत गिते (रा.मलेरिया स्टॉप कॉलेजरोड) अशी गुुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत सतिष अरविंद आहिरे (३५ रा.गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. आहिरे यांना सदनिका खरेदी करावयाची असल्याने त्यांनी सन.२०१८ मध्ये किरण चिंचोरे या रिअल इस्टेट एजंटची भेट घेतली होती. यावेळी संशयिताने ह्युरा गॅस पंपा पाठीमागील मधुबन अपार्टमेंट मधील फ्लॅट क्र. १२२ विक्रीस असल्याचे सांगून सदनिका दाखविली होती.
आहिरे यांना सदर सदनिका पसंत पडल्याने त्यांनी व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी चौकशी केली असता त्याने हा फ्लॅट शिर्के दांम्पत्याचा असून त्यांनी विक्रीचे अधिकार आपणास दिल्याचे सांगितले. त्यामुळे आहिरे यांनी हा व्यवहार केला असता ही फसवणुक झाली. संशयितांनी कट कारस्थान करून आहिरे यांच्याकडून मोठ्या रकमा स्विकारल्या तसेच इसार व कागदपत्र बनविण्याचे बहाण्याने २ लाख ७४ हजार ४९८ रूपये घेतले. या काळात संशयितांनी प्रशांत गिते यांना हाताशी धरून खोटे कागदपत्र तयार करीत आहिरे यांच्या नावे परस्पर कर्ज मंजूर करून घेतल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरराव करीत आहेत.