नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडिलांसह आजी आजोबास जीवे ठार मारण्याची धमकी देत नराधम सावत्र बापाने लहानग्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आजी आजोबाचे घर गाठून बालिकेने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर फुलारे (२७ रा. ओझर ता.निफाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नराधम सावत्र बापाचे नाव आहे. मखमलाबाद शिवारात राहणा-या विवाहीतेस संशयिताने पळवून नेत प्रेमविवाह केला आहे. पतीच्या घरातून लहानग्या मुलीस सोबत घेवून गेलेली महिला सध्या संशयिताच्या ओझर येथील घरी वास्तव्यास आहे. ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान संशयिताने पत्नी घरात नसल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
याबाबत वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांसह आजी आजोबालाही मारून टाकेन अशी धमकी दिली. काही दिवसानंतर मुलीस आपल्या आजीआजोबाच्या घरी सोडण्यात आल्याने या घटनेस वाचा फुटली असून मुलीने आजी आजोबाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मयुरी बयस – पुरे करीत आहेत.